आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?
आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?
श्री.गोविंदप्रभू हे गुंडम राऊळ, गुंडम स्वामी या नावानेही प्रख्यात आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरू असलेल्या श्री गोविंद प्रभू ची महानुभाव संप्रदायातील 'पंचकृष्ण' संकल्पनेत त्यांची गणना केली जाते.
श्री. गोविंदप्रभू यांचा जन्म ११८७ मध्ये 'अनंतनायक व नेमाईसा' या काण्वशाखीय ब्राह्मण दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर (रिधपूर) जवळील काटेसूर हे होते. ते लहान असतांनाच त्यांच्या मात्यापित्याचे छत्र हरवले, त्यामुळे त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशीने रिद्धपूर येथे केला. बोपो उपाध्ये यांच्याकडे त्यांनी वेदाध्यन केले.
श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला.
अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. या काळातील सामाजिक विषमतेला प्रत्यक्ष कृतीतून आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे, ते म्हणजे श्री.गोविंद प्रभू यांनी.
त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. तत्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. हेमाद्री पंडिताच्या चतुर्वग चिंतामणी या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव सामान्य जनतेवर पडलेलाहोता. व वर्तमानकाळातही प्रभाव आहे. त्याकाळी महार, मातंग, चांभार या घटकांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांची घरे गावच्या एका बाजूला स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या महाजनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. "राउळ मातांगा महाराचां घरोघरीं विचरताति : आणि तैसेचि दीक्षिता । ब्राह्मणाचां घरी विचरताति" असे उद्गार त्या मंडळींकडून येऊ लागले. श्रीगोविंदप्रभू मातंग महारादी शुद्रांच्या घरी जातात. हा परिवर्तनवादी बदल गावातील महाजनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून महार , मातंग यांच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार महाजनांना रुचला नाही.
शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली "राउळो : आम्ही पाणियेंवीन मरते असों : तरि काइ की जी : ?" त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. "राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो." असे उद्गार या बांधवांनी काढले. या अगोदर दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या अगोदर असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही. गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला. स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होय: हे करणचरणवंत ब्रम्ह होय: जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे " ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. त्यांनी १२८५ मध्ये देहत्याग केला.
वर्णाश्रम धर्माची चौकट मोडून मानवतेच्या दृष्टिकोणातून समतेचा आदर्श घालून देणारे ते आद्य सुधारक ठरतात. अनाथ आणि असहाय स्त्रियांना त्यांचा फार मोठा आधार वाटे. मात्र त्यांनी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर संचार केला नाही. अमरावती जिल्ह्यापुरतेच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले.
परंतु आज पुरोगामी महाराष्ट्रात सर्व परिवर्तन वाडी विसरले की काय ?असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाही ना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक ठरतात ,असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
संदर्भ : मराठी विश्वकोश ,
वि.भि कोलते : श्री गोविंदप्रभू यांचे चरित्र.
Comments
Post a Comment