भैरव


भैरव

भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात भैरोबा किंवा बहिरोबा देवाचे ठाणे असतेच असते. कधी त्याची मूर्ती असते, तर कधी तांदळा असतो. जी मूर्ती उभी असते, तिच्या उजव्या हातात डमरू आणि डाव्या हातात त्रिशूल असतो. भैरोबा देवाचे वाहन कुत्रा आहे.

महाराष्ट्रातील भैरवमूर्ती सामान्यत: नग्न असतात. त्यांच्या कंबरेला सापाचा कडदोरा असून, गळ्यात नरमुंडमाळा असते. चेहरा भयानक, नाकपुड्या रूंद आणि तोंडाच्या दोन्ही बाजूंना सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो.

भैरवांना चार, आठ, बारा किंवा त्याहून अधिकही हात असतात. त्या हातांतून विविध शस्त्रे असतात. डाव्या बाजूच्या खालच्या हातात नरमुंड असते व त्यातून रक्त ठिबकत असते. ते ठिबकणारे रक्त कुत्री चाटत असतात.

भैरवाचे ‘शैव आगम’ या ग्रंथात चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. तो शिवभक्तांना प्रिय ग्रंथ आहे. आठ भैरवांचा एक असे आठ वर्ग होतात. त्यांचे प्रमुख अष्टभैरव या नावाने ओळखले जातात. त्याशिवाय कालभैरव, बटुकभैरव असेही भैरव प्रसिद्ध आहेत.

तंत्रग्रंथांत चौसष्ट भैरवांना चौसष्ट योगिनींचे स्वामी मानले गेलेले आहे. योगिनी म्हणजे शक्ती. म्हणून भैरव हा प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण करत असतो असे म्हटले जाते.

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)