लेडी शेलॉट : एक आख्यायिका
लेडी शेलॉट : एक आख्यायिका
लेडी शेलॉट : एक आख्यायिका
सरदारांनी आपल्या कन्येसाठी हा किल्ला बांधून घेतला होता.
त्याचे बांधकाम, विस्तार, त्याचे बुरुज एका आख्यायिकेचा भाग होते.
आख्यायिका सर्वस्वी खर्या थोड्याच असतात ?
डोंगरपठार आणि त्याला वळसा घालून वहाणारी नदीची चमचमती रेषा यामुळे बेटासारख्या वाटणार्या त्या भूभागावर किल्ला उभा होता.निळ्याशार आकाशावर एक काळीशार चित्राकृती.त्याच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश दृष्टीपथात येत असे. काड्यापेट्यांतील घरे मांडल्यासारखे सुबक गाव,तिठा, वाटा अन बाजारपेठा.पायवाटांवरून रमत गमत चाललेल्या ग्रामकन्या , ग्रामस्थ.किल्ल्याजवळून जातानाची त्यांची कुजबूज, त्यांचे वळून पहात कसलातरी वेध घेत तेथून जाणे.
त्या आख्यायिकेचा केंद्रबिंदू शोधत.लेडी शेलॉट.
सरदारांनी आपल्या कन्येसाठी, लेडी शेलॉटसाठी, हा किल्ला बांधून घेतला होता.किल्ल्यात येणारीजाणारी त्यांच्या विश्वासातली काही माणसे अन रक्षक सोडल्यास तिथे राहाणारी दोनच माणसे होती.लेडी शेलॉट आणि तिची दाई, जी आवश्यक कामांसाठी क्वचित गावात जात-येत असे.तिथूनच तर सगळी आख्यायिका गावात पसरली होती.
लेडी शेलॉटचं आरस्पानी सौंदर्य, तिच्या कोमल बोटांतून झरणारं कुशल विणकाम, तिचा स्वर्गीय स्वरसंभार.
तिच्यावरचा शाप.
लेडी शेलॉटने म्हणे गावाकडे एक नजर जरी टाकली तरी तिचा सर्वनाश ठरलेला होता.म्हणूनच तर किल्ल्याच्या एका बुरुजात तो प्रख्यात कोनाकोनांचा आरसा सरदारांनी बसवला होता.दिवसभर गावातल्या वाटांची, पेठांची, घराअंगणांची प्रतिबिंबे त्या विशाल आरशात कोनाकोनातून उमटत. दिवसभर तिथे बसून एकीकडे झरझर विणकाम करत लेडी शेलॉट उत्सुक निरागस डोळ्यांनी ती चित्रमाला न्याहाळत राही.
आरशातली ती चित्रे एकमेकांत गुरफटून तिच्या विणकामातील अर्ध-आकलनीय आकृती बनत. तिने बनवलेले सुंदर ताणेबाणे निगुतीने जपणे दाईचे काम, कधी ते काढून न्याहळत बसणे हा लेडी शेलॉटचा विश्राम.
कधी या असल्या जन्मठेपेला कंटाळून एक आर्तमधुर स्वरलकेर तिच्या गळ्यातून उमटे तेव्हा वाटेवरचा वाटसरू शहारून जात असे.लेडी शेलॉट खरेच अस्तित्वात असल्याची तेवढीच खूण होती.
संध्याकाळ झाली की किल्ल्याचे उंच उंच बुरुज काळोख पिऊन उग्र भासू लागत. किल्ल्यातला एकांत शांततेच्या किंकाळ्या मारणार्या पिशाच्चासारखा अंगावर येई.आरशासमोरून नाइलाजाने हटून मग लेडी शेलॉट किल्ल्याच्या अंतर्भागात जात असे. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात दाई तिला गावातल्या गोष्टी सांगून रिझवी.
वरचे आकाश नक्षत्रांनी झगमगू लागे.चंद्राचं झुंबर लखलखू लागे.अशातच तिचे गीत जागून उठे.
लेडी शेलॉटचे सूर माळावरच्या थंडगार वार्याबरोबर स्तब्ध आसमंतात दूरवर पोचत. गावातल्या आया त्या तालावर छोट्या बाळांना निजवताना स्वत;शीच चुकचुकत.त्यांचे जीवन सुंदर करणार्या त्या स्वरांची मालकीण एकाकी होती. तिचे जीवन शून्याकार होते.
स्वतःच्या शापाशीही स्वतःचा एक करार असतो. लेडी शेलॉट तो कसोशीने पाळत होती.
दु:खात सुखी होती.
दु:खात सुखी होती ?
दिवसरात्री अशाच जात होत्या.
त्या रात्री दाई येणार नव्हती. गावात कुणाचेसे लग्न निघाल्याने ती तिथे जाणार होती. ज्यांचे लग्न होणार होते ते जोडपे वाटेने येताजाताना लेडी शेलॉटने कितीदा आरशात पाहिले होते. एकमेकांना बिलगलेले. एकमेकांत हरवलेले.त्यांना निरखणारी तिची नजरही हरवत गेली होती कितीदा. विणकामाचे टाके बोटात घुसून बोटे रक्तबंबाळ होऊ लागली होती अलिकडे.
त्या रात्री मग किल्ल्यातल्या बुरुजातल्या सावल्या सावकाश आकाशभर झाल्या. मागल्या अंगणात एकटीनेच फेर्या मारणार्या लेडी शेलॉटची शुभ्र वस्त्रे झुळुकांमध्ये सळसळू लागली. दूर गावात वाजणार्या तालवाद्यांचा ताल पकडून तिचा स्वर उंच उंच टिपेला पोचू लागला.
आजचा काळोख मख्मली होता. नक्षत्रांचे जडावकाम आज खूपच झगमगत होतं . चंद्राचं झुंबर आज तेजाळलंच नव्हतं ना !
झुळुका अधिकाधिक धीट होऊ लागल्या.लेडी शेलॉटचं शुभ्र उत्तरीय उडून मागल्या दरवाजाच्या गंजक्या कडीला अडकलं.वेलीवरची शुभ्र कळ्याफुलं दचकून सुगंधाची बरसात करत उंबरठ्यावर विखुरली.
अडकलेलं उत्तरीय सोडवून घेणारी लेडी शेलॉटची बोटं तिची राहिली नाहीत. तशीही ती तिची कुठे होती ? विणकाम करताना ती बोटं तिलाच चकित करायची नवेनितळ चित्राकार धाग्याधाग्यात उलगडून.
आज ती बोटं जुनाट गाफिल कडीशी झुंजत होती.करकरत ती कडी उघडली.
लेडी शेलॉट कुठे गेली ?
माळावर रात्रभर स्वर्गीय संगीताचे सूर विहरत राहिले.
दाईने परतल्यावर काय पाहिले ? काय सांगितले?
बुरुजातला आरसा तडकला की सरदारांचे माथे ?
कुणी म्हणाले, एका नावेत बसून लेडी शेलॉट नदीच्या प्रवाहाबरोबर वाह्त गेली.कुणी म्हणाले एका देखण्या सरदाराला घोड्यावरून दौडत येताना तिने नुकतेच आरशात पाहिले होते.कुणी म्हणाले की शाप खरा झाला. पलिकडच्या गावात म्हणे धारेला लागलेला तिचा निष्प्राण देह मिळाला.पण मग माळावरच्या रानवार्यात अजूनही गुंजतात ती मधुर गाणी कुणाची ?
आख्यायिका सर्वस्वी खर्या थोड्याच असतात ?
-जिगिषा
Comments
Post a Comment