काही मजेदार कोडी तुम्ही सांगू शकता का?

इतिहास हा आवडता विषय असला किंवा नसला, इकडच्या प्रत्येक लेखक/लेखिका आणि वाचकाला मराठ्यांचा, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा वरवर इतिहास माहीत असेल असे गृहीत धरून पुढील कोडे घालत आहे.

कोडे वाचण्याआधी खालील टीप वाचावी.


किल्ल्यांची नावे ओळखा.

1 घेतली आन, मोडुनी भान

मुक्त करी देश,

गड बेलाग, त्यावरी आग

दिला संदेश ।।


2 लढविले तट, उधळला कट

माणसे कैशी

जरी भुईकोट ,भेदिले गोट

गावे चौऱ्याऐंशी ।।


3 नाव हिरकणी, बाळ तिचे गुणी

उतरली रात्री

राजा बांधे बुरुज, नाव दिले

तिज करुनिया खात्री ।।


4 उचलला भार, लावली पहार

नाद होई ठण्ण

देवीची कृपा ,होतसे नृपा

गवसती होन ।।


5 उंचहा कडा ,त्यावरी वाडा

असा बाले किल्ला

सैन्यासह वस्ती ,दुष्मना धास्ती

ना करी हल्ला ।।


6 धिप्पाड शरीर बळात ,

रौद्र जळात सागरी लंका

तरंगती होडी , लावू कशी

शिडी येते मनी शंका ।।


7 भोरप्याचा प्रबळ डोंगर ,

झेंडा बुरुजावर अवघड जागा

फाडिले पोट ,उधळला गोट

मारिली पागा ।।


8 सज्ज आरमार, बेट कुरट्यावर

शिशाचा पाया

उठवला दुर्ग दर्यात, असे रेतीत

धोंडा मोरया ।।


9 दमयंती सवे तो बसे, गाली मग

हसे महाली पाणी

कोसळती नरमादी ,धबाबा

आदी प्रपाती गाणी ।।


10 इतकासा असुनी हा किल्ला,

सहा साल लढला

अशी हातघाई

मुघलांनी करुनि जिहाद ,

नाही दिली दाद

रामे बादशाही ।।


11 लढवून भव्य हा किल्ला ,

उतरुनि गेला राजा पावसात

निश्चये करुनि प्रचंड ,राखली

खिंड नाही केला घात ।।


12 शिलाहार बांधती दुर्ग,

भासे जो स्वर्ग असा घेरिया

हेलियमचा लावूनी शोध ,

घेतसे बोध कुणी अवलिया ।।


13 पाकळ्या असती या सोळा,

मधोमधे गोळा असे हिरण्याचा

देखणे भोवती तळे ,

सिद्ध योग बळे प्रदेश पुण्याचा ।।


14 वेली घनदाट, असे हा घाट

दगडी रांजण

बैलांचे दिसती तांडे, स्वेद

जरी सांडे तुडवती जन ।।


15 आकाशी जातसे कळस,

मंदिरी पळस कडा अनुल्लंघ

चढताना लागते धाप ,

होई अनुताप तरी मन दंग ।।


16 वारेवा खोल किती कडा, कोकणी पडा लागु नये नजर

रोहिदास तारामती जोडी,

शिखरे खडी दिसे इंद्रवज्र ।।


17 रुधिराने सिंचली माची, रणकार्याची लावली बाजी

तुटले जरी किती , माळेतील

मोती राज्याचे काजी


18 कातळा करुनिया भंग , उभा तुरुंग सात हौदांचा

असह्य सुळका , ये न कुणा पुळका राजकैद्यांचा ।।


19 रानात वेढती रिस, जिथे रात्रं दिस तेलीणी सोटा

जाहला बापू का खस्ता, काढता रस्ता सांभाळी कासोटा ।।


20 पायथ्याशी याच मैदानात, राव आणि पंत पराक्रमी सक्ती

घेतला मोठा हा घास ,मुघली इखलास पराजय प्राप्ती ।।


टीप - जर एक उत्तर येत असेल तर टिपण्णी मध्ये सांगावे. एकापेक्षा अधिक येत असतील तर संदेश पाठवू शकता. परंतु टिपण्णी मध्ये कोणतेही एकच उत्तर टाकावे जेणेकरून इतरांना उत्तर द्यायची संधी मिळेल.

मी २ दिवसांनी सगळी उत्तरं टिपण्णी मध्ये देईन.

Comments

Popular posts from this blog

पुराणकथा

MAHMUD GAWAN, 1411-1481 A.D.

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?